कथा
कथा
सूरपारंब्या खेळण्यात निष्णात असलेल्या राजा विक्रमादित्याने वेताळावर हात टाकला. हरल्याची कबुली देत वेताळ राजाच्या पाठुंगळी बसला. “तुला मी जंगल फिरवून आणतो, पण मला एक गोष्ट सांग. तुझ्या गोष्टी मला फारच आवडतात.” अशी गळ घालत, उत्तराची वाट बघत राजा चालू लागला.
“तू काही मला गप्प बसू देणार नाहीस. ठीक आहे. तर मग ऐक.” असे म्हणून वेताळ गोष्ट सांगू लागला.
केरळमधल्या एका अरण्यात, डोंगरावर भृगुराज नावाचा एक हत्ती रहात होता. आपले आईवडील, मित्रमैत्रिणी, बांधव, असा त्यांचा भलामोठा गोतावळा होता. भृगुराजला सगळ्यांनी लाडावून ठेवले होते. सतत मोठ्यांच्या विळख्यात असे तो. वयाच्या उमेदीत येत असताना त्याला हा सॅाफ्ट टॅाइजच्या मऊ मिठीसारखा वाटणारा विळखा रुतायला लागला होता.
त्याची आई रमादेवी आणि मार्तंडराज ह्यांच्याशी सखल चर्चा करुन भृगुराजने सात-आठशे कोस दूर वैश्वारण्यात जायचा निर्णय घेतला. मार्तंडराज आणि रमादेवीने त्याला बसवून चार व्यावहारिक गोष्टी सांगितल्या आणि प्रवासासाठी शिदोरी बांधून दिली.
डोंगररांगांच्या आसऱ्याने चाललोला भृगुराज मस्तीत होता. खायला हवे तेवढे बांबू, सोंड, कपोल खाजवायला भलेमोठे वृक्ष मिळत होते. मध्येच वयाची खुमखुमी, तरुणाईचे बळ दाखविण्यासाठी उन्नत वृक्ष उपटून फेकून देत, पुढे तो वैश्वारण्यात जाऊन पोहोचला.
ऐकले तर खूपच होते. वैश्वारण्याचा अनुभव घेऊन भृगुराज खूश झाला. मातृवनासारखाच आभास होता, पण तरीही काही वेगळेपण होतं. माकडांचे आकार वेगळे होते. त्यांचे चेहरे वेगळे होते. रानकुत्र्यांचं भुंकणं तेच होतं पण चाल वेगळी होती. भृगुराजला त्याचे जातभाई दिसत होते, आपापसांत मग्न.
त्यातल्या एका कबिल्यातून कृष्णराज पुढे आला. “काय म्हणतोस? भाषा एकच आपली.” भृगुराजने आपले हास्य पसरले, “होय महाराज. आपलं नाव काय? आपण इथेच वास्तव्याला असतां का?”
“मी कृष्णराज. तू लहान दिसतोस. नाव काय? आमच्या कंपूत ये. मजा येईल. दंगा करू, खाऊ पिऊ, मिसळून राहू.”
भृगुराजला चांगलंच हसू फुटलं. “सगळं सोडून आलोय आणि आता तुमच्यात येऊ? ह्या!” असं मनात म्हणत, तोंडदेखलं “हो” म्हणून भृगुराजने पुढची वाट धरली.
समोरच्या झाडाला गाल घासतांना त्याचं मोठं डोकं विचार करतच होतं, “काय तो कंपू, काय ती बालकं, काय ते प्रौढ, सगळं कसं वोक्के हाये. पण नकोच ते! एक तर आपल्या वयाचं कुणी नाही. कंपूत गेलं की कामं करायला लावतील. त्यांचे उद्योग वेगळे. छे! आपण आपलं राहू स्वच्छंदीच.”
भृगुराजची पायपीट चालूच राहिली. त्याला सवंगडी मिळतच गेले. राधाराणी, गजाली, देवराज असे बरेच हुंदडगडी त्याने मिळविले. झाडपाला खात रहायचा, पायपीट करत रहायची, धुडगूस घालत रहायचा. मज्जानी लाईफ!
असाच एक दिवस पहाटे जाग आल्यावर भृगुराज चालू लागला. थोड्याच वेळा आपले गडी भेटतील ह्या विचारांत एकेक पाऊल टाकताना पाचोळा सरला आणि मोठा चीत्कार करत भृगुराज सापळ्यात पडला. खड्डयात पडतांना त्याला त्याचं भविष्य दिसत होतं. गुडघे फुटले होते. सोंड पूर्ण रक्तबंबाळ झाली होती. पायांचे चवडे उखडले होते. तरीही खड्ड्यातून बाहेर यायचा तो प्रयत्न करत होता. पर्यायच नव्हता. एरव्ही स्वतःच्या ताकदीवर खूप विश्वास, पण आता तो कोलमडला होता. त्याचे खेळगडी जवळून गेले. पण त्यांना ना भृगुराज दिसला ना त्याचा आवाज आला. आपल्याच मस्तीत ते निघून गेले. तीनचार तास भृगुराज झगडत होता. थोडा वर येई आणि पुन्हा खड्ड्यात.
पूर्ण यश मिळत नव्हते. अचानक त्याला कृष्णराजचा आवाज आला. भृगुराजची पाठ असली तरी कुजबुजीवरून त्याने ताडलं की कृष्णराज एकटा नाहीये. त्याचा कंपूही आहे. एवढ्याशा खड्ड्यातून भृगुराज काही वळू शकत नव्हता. पण त्याला कुणी वरुन सोंडेने ढकलायचा प्रयत्न करतंय असं वाटलं. भृगुराजनेही जोर लावला. काही तरणीताठी मंडळी समोरून आली. सोंडेत सोंडी अडकल्या आणि भृगुराजला खेचायचे प्रयत्न सुरु झाले. अर्ध्याएक तासाच्या अशा सर्कशीनंतर भृगुराजचा पाय खड्ड्याबाहेर पडला आणि सगळ्यांचे श्वास ताळ्यावर आले.”
गोष्ट सांगून झाल्यावर वेताळ विक्रमाच्या खांद्यावरुन उडी मारुन वडाच्या पारंबीवर जाऊन बसला.
ही गोष्ट वेताळाने का सांगितली असेल ह्याचा विचार करुन विक्रमादित्याच्या डोक्याची शंभर शकलं होऊ घातली होती. त्यांना कसेबसे एकत्र आणून तो म्हणाला, “वेताळा, मला तुझ्या गोष्टी ऐकायला आवडतात म्हणून मी इथे येतो आणि तू विचारांचा भुंगा सोडून बसतोस वडावर. का सांगतोस अर्धवट गोष्टी?”
मिश्कील हसत वेताळ म्हणाला, “राजा, पिंपळ सोडून मी जेव्हा वडावर आलो, तेव्हा एकटा होतो. पारंबीवर उलटा लटकत असताना पारंबीच तुटली. इथल्या भुतावळींनी दिलं सोडून मला एकट्याला. नेहमीच कृष्णराजसारखे भेटत नाहीत. राजन्, आपण कुठेही कधीही समूहाचा भाग होऊन एकरूप होणं हे क्रमप्राप्त असतं. भृगुराजने हे वेळीच केलं असतं तर त्याला कदाचित तीनचार तास एकट्यालाच झगडत रहावं लागलं नसतं.आणि त्याला कृष्णराज भेटला नसता तर पारध्याने त्याचे काय हाल केले असते देवच जाणे. “मला नाही त्यांची गरज,” ही वर्तमानातली वृत्ती भविष्यात आपल्यावरच उलटू शकते. भृगुराज हा नशीबवान निघाला.”
विक्रमादित्याच्या डोक्याची शकले आता एकत्र येऊन चमकू लागली. एकत्र रहाण्याच्या गरजेचा विचार करत तो पुन्हा वेताळाशी सूरपारंब्या खेळू लागला.
दहा वर्षं होऊन गेली. वडाची पिलावळ कुठवर पसरली असेल? तिथंच पलिकडं एक वारुळ होतं. मुंग्याचंच राहिलं असेल की फोडलं असेल कुणी? सकाळी सकाळी तोऱ्यात मिरवणारा भारद्वाज! कितवी पिढी फिरकत असेल आपल्या घराकडे त्याची? मुंगसांची जोडी खळखळ तरुन असेल दुडदुडत. धबाबा आदळणारा पाऊस नागमोडी वाट काढत दगडांना गुळगुळीत करत वाहत असेल खळाळा. विचारातनं संध्या जागी झाली ते समोरचा आवाज न करणारा पाझरणारा, डोहातून झरणारा निर्मळ झरा पाहून.
संध्या जशी मोठी होत होती तसं तिला तिचं अस्तित्त्व जाणवू लागलं होतं. शाळेत, सुटामध्ये धावताना तो प्रकाशचा निसटता स्पर्शही तिला नखशिखांत मोहून टाकत होता. आईपाशी काही बोलावं ह्या निर्णयापर्यंत पोहोचता पोहोचता ती अडखळत होती. घरी आल्यावर आईच्या कितव्या हाकेला ओ देतेय हे तिचं तिलाच कळत नव्हतं.
संध्या चारेक वर्षांची असेल. बाबा नावाच्या सवंगड्याशी खेळणं, आईच्या हातून न्हाऊन माखून घेणं, ठकीचं सजवणं हे तिचं विश्व. सुख म्हणजे काय असतं हे न कळायच्या वयातच ते अनुभवायचं असतं आणि तेच ती करत होती. “ताई” ही आईची हाक ऐकून मात्र ती गांगरुन गेली. नक्की काय हे तिला ठाऊकच नव्हतं. आजपर्यंत मोती, टेडी, ठकी ह्या खेळगड्यांच्या गर्दीत तिने हा शब्द स्वतःसाठी ऐकलाच नव्हता. काहीतरी वेगळं आहे ह्याची खूणगाठ पक्की होती.
दिवस सरता सरता, आईचं पोट तिला आईनी मारलेल्या हाकेचं गणित सोडवत होतं. संध्या खूश होती. उंबऱ्यावर वाटी उपडी न टाकताच कुणी पाहुणा येणार म्हटल्यावर हरखायला होतंच.
तेजस! चिमुकली पावलं दिसायला लागली. संध्याचं त्याला गोंजारणं, आपणच खूष होणं, काहीबाही आवाज करणं तेजसला आवडत होतं की काय, तो सतत एकटक लावून बघायचा. डोळे मोठी चमक दाखवत होते. कसली ते तिला कसं कळणार? ती ताई होती.
रश्मी, संध्याची आई, आताशा गप्प असे. स्वभाव तसा शांतच होता तिचा. पण मग हसऱ्या झऱ्याचं, बाबाचं काय? गंधकाची गोळी पडल्याप्रमाणे त्याचं तापमान वाढलेलं असायचं हल्ली. ऑफिसमधला ताण? असेलही. तेजस वाढत होता. प्रगती चांगली होती. एकटक बघण्याबरोबरच सतत टाळ्या वाजवायला लागला होता. संध्याला तिचं टाळ्या वाजवणारं किल्लीचं खेळणं आठवू लागलं. एव्हाना ती ८-१० वर्षांची झाली होती. तेजस नावाचं खेळणं तिचं आवडतं होतं. सगळंच बदलत होतं. चिडचिडा बाप आणि मुकी आई.
घरात काहीतरी बिनसलं होतं आणि कदाचित काहीच बिनसलं नव्हतं. कुठेतरी काहीतरी वेगळं होतं खरं. तेजस आता ५-६ वर्षांचा झाला होता. त्याचा तो एकसारखे चेहरे असणाऱ्यातला तो विशेष चेहरा त्याचं विशेषत्त्व सांगत होता. संध्याला थोडंफार कळत होतं, पण तरीही काहीच कळत नव्हतं. घरची आर्थिक परिस्थितीही चांगलीच होती. सगळं काही होतं पण तरीही काहीच नव्हतं. बाबांचं बाबा असणं संपून अनेक वर्ष झाली होती. आईचे डोह लांबूनच पहात ती मोठी होत होती. डोह तर तेजससाठी रिते होत होते.
आणि मग आपसूकच शाळेतल्या त्या सवंगड्यांची ओढ खेचू लागली. प्रकाश हा संध्यासाठी कवडसाच. तिला खूप वाटे, कवडशाला हातात घ्यावं, खेळावं. पण कवडसाच तो. हवाहवासा स्पर्श करुन वाकुल्या दाखवून स्वतःच हसणारा. तिला नक्की ठाऊक होतं की हा कवडसाच आपल्याला उजळून टाकणार आहे.
कांचनमृगाच्या मागे बेभान होऊन धावणं हीच तर असते ह्या वयाची गाथा. त्यातून मारिच निघणार की कुणा रामाच्या गळ्यातला हार होणार ह्यावर ठरते यशोगाथा. मांडीवर बसून झोके घ्यायचं फुलराणीचं वय ओलांडताना कुणी रविकर सोबतीला असेल तर पुढचं डोलणं डौलदार होतं. संध्याला मात्र आईच्या डोहात आणि बाबांच्या अग्निकुंडात काहीच गवसत नव्हतं. माळरानावरची फुलराणी होऊन बसली होती ती आणि मग कवडशामागे मुग्ध होऊन गेली. तेच आयुष्य. आजूबाजूला विणलेलं एक आच्छादन. त्यात प्रवेश फक्त प्रकाशला. बाहेर असेल कुणी तेजस, बाबा, आई.
आवरणातला प्रकाश तरी तिचा होता का? की तोही फक्त कवडसाच, मुठीत पकडताना मुठीत न येणारा? मनाच्या कपारीत मात्र त्याला घट्ट धरुन ठेवला होता. कॅालेजमधे जाईस्तोवर रोज कपारीत डोकावून पहायचं आणि छताकडे पाहून हळुवार हसायचं हा छंदच जडला होता तिला. कॅालेजात तिला कवडशाबाहेरचा सूर्य दिसायला लागला होता आणि तिनं विणलेलं आच्छादन विरायला लागलं. आता तिच्याही जाणीवांनी भरारी घेतली होती. संध्याप्रकाशचं नातं निश्चित होऊ घातलं होतं. पण प्रकाशचं काय? भुंगाच तो! फूल मिळालं की मरंदासाठी पाकळ्यांच्या स्वाधीन करणारा गडी तो. नातं नाकारायचा प्रश्नच नव्हता. सुषुप्तीतून बाहेर पडण्याचा हा क्षण. संसार आणि व्यवहार ह्यांच्यासाठी अर्धोन्मीलित डोळे पूर्ण उघडण्याची ही वेळ.
वर्षे सरली आणि संध्याप्रकाश जुंपले रहाट गाडग्याला. पुढे जाताना आई, बाबा, तेजस माहेरच्या उंबरठ्यापाशीच थांबलेत ह्याचा विचार करण्याची गरजच वाटली नाही तिला. तिघेही तिची पाठमोरी मूर्ती बघत होते. तेजस आजही एकटक बघत होता आणि जोरजोरात टाळ्या वाजवतच होता.
आज अचानक फोन खणाणला. “प्रकाश, जायला हवं.” फोन ठेवतानाच संध्या उद्गारली. तिच्या डोळ्यांत प्रश्न होते. प्रश्नांनाच प्रश्न करावेत असं प्रकाशला वाटलं नाही. त्याने मूकपणे बॅग भरली. प्रश्नांची उकल संध्याकडेही नाही हे त्याला ठाऊक होतं. संध्याला कांचनमृगातला मारिच नव्हे तर त्याची शिकार करणारा राम मिळाला होता ह्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
दहा वर्षांपूर्वी प्रकाशबरोबर जाताना पाणी सोडलेल्या माहेराकडे ती परतत होती. मध्यंतरी, माहेर नावाचा शब्दही तिच्या कोषातून गायब झाला होता. धकाधकीचं जीवन तर होतंच पण २०-२५ वर्षांचा तेजस अजूनही टाळ्या वाजवत हसताना पाहिला की मन विषण्ण व्हायचं. त्याच्यासाठी तिला खूप वाटायचं पण मग ते बाबा नावाचं धोतऱ्याचं झाड, रश्मीची शून्यतेची मूर्ती आठवली की तिचे पाय थबकत. आज मात्र पर्याय नव्हता.
बसच्या प्रवासात हा सगळा पट उलगडत होता. उजळणी होता होताच तिचा मूकप्रवास संपला होता. माहेरच्या दारात येउन ती थबकली होती. आजूबाजूला विदीर्ण झालेला निसर्ग दिसत होता. दहा वर्षांपूर्वीचं काय राहिलंय हे शोधण्यात काही गमक नव्हतं. काळाबरोबरच निसर्ग दिसत होता. दहा वर्षांपूर्वीचं काय राहिलंय हे शोधण्यात काही गमक नव्हतं. काळाबरोबरच निसर्गाला हाकून लावायचं काम जोमानं झालं होतं.
तिची नजर घराकडे गेली मात्र, डोक्याची बंद कवाडं उघडल्यासारखी झाली. कोविडकाळ, परिस्थिती ताडणं काही अवघड नव्हतं. तिची रश्मीशी नजरानजर झाली आणि तिच्याबरोबरच प्रकाशच्या प्रश्नांचीही उकल झाली. तेजसला कोविडनी मुक्त केलं होतं. धोतऱ्याचं झाडही खुडलं होतं. समोर निस्तेज डोळ्यांचे डोह, आज ओसंडून वाहात होते. संध्याच्या डोळ्यांनाही पूर आला होता. मायलेकींचा दोन दशकं लांबलेला दुष्काळ संपला होता. संगमाचा साक्षी प्रकाश निशब्द उभा होता.
सकाळी उठले की धावपळ चालू होते. एका क्लास मधून दुसरीकडे, शाळेतून ग्राउंड वर, तिथून चित्रकला. पळापळ नुसती. त्यामध्ये पोहणे देखील असतेच. ह्यातलीच एक गोष्ट. ग्राउंड वर जाऊन खेळण्याची.
तुम्हाला सांगतो बास्केट बॉल खेळण्यासाठी रोज सकाळी लवकर उठून जावे लागते. एकदा तसाच गेलो होतो. वार्म अप झाले. आणि थोड्याच वेळाने पलीकडच्या वडाच्या झाडावरून एक मोठ्ठा दोर लोंबकळताना दिसला. त्याखाली एक कुत्रे भुंकत होते. भू भू भू…..वर बघायचे आणि परत इकडे तिकडे बघायचे. त्याला नक्की काय करायचे होते तेच कळेना. आमचे टप्पे थोडे मंदावले होते आणि नजर त्या झाडाकडे स्थिरावली होती. हळूहळू त्या कुत्र्याने आपले आप्तेष्ट देखील जमवले होते. ते सगळे कधी वर, कधी एकमेकांकडे तर कधी आमच्याकडे बघत होते. त्यांचे जणू संमेलन होते आणि दोर मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते.
आमचे लक्ष पुन्हा वेधून घेतले त्या दोरखंडाने. वर सरकला तो. कसा काय? आता आम्ही सरसावून बघू लागलो. कोणी चेष्टा करत होते की काय? कुत्र्यांचे भुंकणे चालूच होते. हळूहळू आम्ही झाडाच्या दिशेने सरकू लागलो. त्याचबरोबर दोर देखील सरकला. आम्ही सर्द. काय हे? काही कळत नव्हते. त्याबरोबर कुत्र्यांचा संघही सरकला. आता मात्र ह्या सरकण्याचा वेग वाढला. कुत्री इकडे तिकडे सरकू लागली. त्यांना कळेना कुठली जागा पटकवावी. पळता पळता एकाचा पाय दुसऱ्यावर दुसऱ्याचे डोके तिसऱ्यावर अशा चमत्कारिक अवस्थेत तो समूह उभा. आता भू भू ची भाषा बदलून भूSS, क्या, क्या, कुई, कुई, असे विचित्र आवाज येत होते. कुत्र्यांची सेना आणखी हातघाईवर आली होती. त्यातच दोराने मात्र आता कमाल केली. त्याने तर झाडच बदलले. आता मात्र आमची वानरसेना म्हणाली त्या दोराचा शोध घ्यायलाच हवा.
श्वानसेनेची पर्वा न करता आम्ही पोहोचलो झाडाखाली. आणि उडाली आमची भंबेरी. मघा जी श्वानपथकाची अवस्था होती, तीच आमची झाली. इकडे पळा तिकडे पळा. कोणी कोणाच्या डोक्यावर पडत, कोणी कोणाला कोपरा मारत, कोणी ओये म्हणत, कोणी नुसतेच डोळे फिरवत, कोणी अक्षरशः भ भ करत, कोणी मेलो मेलो म्हणत, कोणी आई बाप आठवत, कोणी सर सर म्हणत आम्हा सगळ्यांचीच पळता भुई थोडी झाली. पळून पळून दमलो. आजुबाजूला पाहिले. सगळे कसे शांत झाले होते. हुश्श म्हणालो आणि…..आई ग. कोण ते…..कोणी चापट मारली? कोणी एवढ्या जोरात आपला हात चालवला? आणि मी भुईसपाट झालो पार. ह्या विचाराने उठून पाहिले आणि हाय….पुन्हा भोवळ येऊन पडलो. आपले पूर्वज समोर ठाकले होते. त्याच माकडांची शेपटी दोरासारखी दिसत होती मघा.
आता आपल्यातला आणि त्यांच्यातला दुवाही कळतोय. तेही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, आपणही, एका क्लास मधून दुसऱ्या क्लासमध्ये, एका कंपनीतून दुसरीत, उड्याच तर मारत असतो.
असो. आता मजा वाटतेय मागे वळून बघताना, पण तेव्हा मात्र पार गाळण उडाली होती हेच खरं.
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये .... खर्जातला एक बारीकसा सूर. मऊशार लुगड्याच्या गोधडीतून ऐकताना तो अधिकच मृदू ऐकू येत होता. सूर कानावर पडताना अजितच्या पापण्या हालत होत्या. त्यांना जागं करायलाच हा प्रात:स्मरणाचा समृद्ध गजर चालू होता जणू. आळस देताना कॉट कचरली, पांघरुणे सरली. आपसूकच हातांची ओंजळ सामोर आली. अर्धोन्मीलित डोळ्यांतून त्याकडे पाहात, अजितची वाणी कराग्रेचा अनुनय करायला लागली. अजितचे डोळे पूर्ण उघडेस्तोवर कानावर पडणाऱ्या रेडिओवरील कूSS आवाजाची जागा आता वंदे मातरम् ने घेतली होती. ह्या भारून टाकणाऱ्या वातावरणाला साथ होती ती स्वयंपाक घरातल्या भांड्यांच्या किणकिण्या नादाची.
सुषुप्तीतून जागृत होताना अजितची रुपरेषा ठरत होती. मोऱ्यानं ओळख करुन दिलेलं ते कुटुंब आज त्याच्याबरोबर गावी येणार होतं. गावातल्या शेतीची आणि बागेची काळजी घेणार होतं. त्याच्या वारीत आज हे नवे गडी सामील होणार होते.
डोळे उघडताना कोपऱ्यातून दिसणारा पिवळसर प्रकाश प्रसन्नतेची साक्ष देत होता. हवेबरोबर येणारा आल्याचा सुगंध प्रसन्नतेला अजूनच खुलवत होता. छोटेखानी खोली त्या सुगंधमिश्रित वाफेने भरून गेली होती. आपसूकच अजितचे पाय त्या वाफेच्या दिशेने वळले. सामोर प्रत्यक्ष चैतन्य, नाना. पहाटे चारला उठून, आह्निके आवरून चहात गुंतायचा हा कित्येक वर्षांचा नानांचा प्रघात.
निशब्द संवाद पुढे नेत नानांनी वाफाळता चहा अजितसमोर सरकवला. रेडिओच्या चालू असलेल्या सुरात कपबशीचा सूर आणि फुर्रर्र पार्श्वसंगीत मिसळत अवीट गोडीचा तो चहा घशापासून पोटापर्यंत कणाकणाला ऊब पोहोचवत होता. हळुहळू त्याची ऊर्जा अजितच्या चेहऱ्यावर जमा होत होती.
पटापट आवरून तो चारचाकी घेऊन तो कामगार वस्तीत गेला.
सुभद्रा, राजा आणि छोट्या अंदूला अजित प्रथमच भेटत होता. अजितने उगीचच वातावरण मोकळं करायचा प्रयत्न केला. “काय, कुठले, शेतावरच काम कसं, अंदू कुठल्या शाळेत जातो,” वगैरे वगैरे. जेव्हढ्यास तेव्हढं उत्तर मिळत होतं. “अजून ६-७ तास एकत्र प्रवास करायचाच आहे, तेव्हा होतील मोकळे.” असा विचार करून अजितने गाडी चालू केली.
राजा आणि सुभद्रेनी त्यांचा संसार गाडीत भरला होता. आठवड्याचे सामान सामावून घेणारी गाडीची डिकी आज एका कुटुंबाचा पूर्ण संसार भरून घेत होती. अजितला कळत नव्हतं की ह्यासाठी आपल्या गाडीचा अभिमान बाळगावा की आपल्या आठवडा बाजारहाटीबद्दल प्रश्न पडावा.
विचार बाजूला सरले आणि ऍक्सलरेटर रेटला. निळसर रंगाला पिवळी झळाळी येत होती. फटफटणं ह्या शब्दाचा अनुभव तो पुन्हा नव्याने घेत होता. गाडीच्या उघड्या खिडकीतून येणारा गारवा, सुरुवातीला फक्त लव हलवून जात होता. हळुवार वाऱ्याने गवताच्या पात्याला डोलवावं तसा. सकाळच्या चहाने भरलेल्या हुशारीने अजितचे डोळे उर्जित राहात होते. जसा वेळ जात होता तशी मोठी बुबुळे बारीक होत होती. निळ्याची जागा सोन्याने घेत घेत आता कर्कशाने घेतली होती. सोनेरी पहाटेतून पिवळी सकाळ उगवली होती. अजित ह्याचा आनंद लुटत होता, गाणी गुणगुणत होता. मागे, ती तिघे जणू एका वेगळ्याच जगात होती!!!
"किती वेळ लागतो साहेब?" सुभद्रेने भंग केला. "चला, आता संवाद चालू होईल." असे वाटून अजित उत्तरला आणि पुन्हा राजाच्या गावाबद्दल बोलू लागला. पुन्हा जेव्हढ्यास तेव्हढीच उत्तरे मिळत होती. रिअर व्ह्यू मिरर मधून अंदाज घ्यायचा प्रयत्न केला तरी अजितला काही थांग लागत नव्हता. "अंदू झोपेला आला असेल. पाहू नंतर."
अजित पुन्हा आपल्यातच गुंतला होता. आता सगळीकडे पिवळे सांडले होते. काळ्याशार सावल्यांनी त्यावर ठिपके मांडले होते. इमारतींच्या सावल्यांनी काळ्या रेघा मारल्या होत्या. प्रवासाला निघालं की अजितला ह्या रेघोट्या नेहमी भेसूरच वाटत. जशा सावल्या व्यापायाला लागल्या तसं आकाश धुरानी भारत होतं, रस्त्यावरून १००० वॉट डोळ्यात फेकत, कानाच्या पडद्याची कंपनं वाढवत शहर आपलं काम करत होतं.
दोन अडीच तासांत अजित फाट्यावर येऊन ठेपला होता. शहर आपले शहरी रंग दाखवतंय न दाखवतंय तोवर तो इथे येऊन पोहोचला होता. त्याचा होरा काम करत नव्हता तो राजाच्या बाबतीत. “ह्या तिघांना नक्की झालंय काय? की असेच आहेत ते?” ह्यांचं उत्तर सापडत नव्हतं.
"काय मोऱ्याला फोन केला का?" विचारत अजितने गाडी बाजूला थांबविली. "इथं काय करायचं आता?" राजानं विचारलं. अजितला राजाचा आवाज विचित्र कापरा वाटला. "काय, बरं नाही का?" अजितनं आपुलकीनं विचारलं. "तसं नाही साहेब." म्हणून राजा, सुभद्रा आणि ते छोटं उतरले अन एका कोपऱ्यात उभारले. तसं अजितने नुसती एक नजर टाकली. तिघंही एकमेकांच्याकडं पाहत कसलं तरी उत्तर शोधत होते.
आपली प्रथमच ओळख होतेय. बुजले असतील. पण तरीही अडीच तासात वाणी उघडूच नये? जरा वेगळं होतं खरं, पण काहीच थांग लागत नसल्याने अजित आपला कार्यक्रम पुढे रेटत होता.
गाडी लॉक करून तो माऊलीच्या पुढ्यात गेला. रामराम करत असतानाच गळ्यात रुद्राक्षमाळा घातलेल्या त्या माउलीने भराभरा डबे काढले. गाडीवरचा गॅस पेटवला. घमेल्यासारख्या कढईत बदाबदा तेल ओतलं. बुडबुड आवाज करत कढईची विहीर तेलानं भरून टाकली. एका मोठ्या ताटल्यात बचकाभर मिरच्या, कोथिम्बिर, आलं, लसूण, कढीलिंब ओतलं. ते सगळं सारण मनसोक्त ठेचून घेतलं. कुणावरचा रागच काढल्यागत!!
कढईत बारीक बुडबुड्यांनी सजावट चालू केली होती. शेगडीची धग, ज्वाळांचा आवाज, ठेच्याचा सुगंध, पारदर्शक तेलाची गरम झाल्याची दवंडी अजितला बेभान करत होती. आता फक्त प्रतीक्षा होती आहुत्यांची. भानावर येत, थोडे दूरवर थांबलेल्या राजाकडे पाहून त्याने खूण केली. मघा उभं असणारं ते कुटुंब आता विसावलं होतं. मास्तरांनी शिक्षा केल्याप्रमाणे उकिडवं बसलं होतं. आतापर्यंत जाणवलेली पण न समजलेली गोष्ट अजितने टिपली होती. सुभद्रा आणि राजा, एकमेकांत देखील वाणी न वापरता डोळ्यांनीच बोलत होते. राजा जणू विचारत होता सुभद्रेला, "तो बोलोवतोय. जाऊ की नको?" राजाला उत्तर मिळालं की नाही कोण जाणे पण मानेनं अजितला नकार कळवला होता.
“अजून तीन साडेतीन तास लागतील रे राजा. खाऊन घे काही." राजाचं उत्तर मिळायच्या आधीच चर्रर्र आवाज झाला आणि अजितची मान नकळतच कढाईकडे वळली. माउलीने आपली कलाकारी चालू केली होती. ठेचा गंधासारखा हाताला लावत, बटाटा, डाळीच्या पिठाचं ते अद्भुत रसायन गोळा करत, हाताच्या दोन गिरक्यात डोळा लावायचा आत “स्वाहा!!!”
पहिल्या दोन तीन आहुत्यांनंतर माउलीने गियर बदलला होता आणि पातं लवायलाही वेळ न देता आहुती पडत होत्या. तेल दिसणार नाही एवढे वडे टाकल्यावर आता वेळ होती मिरच्यांची. झाऱ्यामध्ये मिरच्या घेऊन त्या यथेच्छ तळल्यावर त्यावर मीठाचा मारा करून त्या ताटामध्ये काढून ठेवल्या. एखाद्या मैफिलीमध्ये स्वरगंधर्वाचे गायन होण्यापूर्वीच कुण्या स्वराधीशाने वर्दी लावावी असा हा योग. अजितचा बांध सुटत चालला होता. वडा उतरला रे उतरला की नरडं भाजण्याची चिंता न करता जिभेचे लाड तो पुरवणार होता. पोटाने लाल बावटा दाखविल्यावर जिभेच्या लालसेची पर्वा न करता तो थांबला होता. खवळलेली जीभ शांत करण्यासाठी अजितने अर्धा कप फुळकोणी घशाखाली उतरवले आणि प्रवासासाठी वडे बांधून घेतले.
हातातलं पुडकं राजाच्या हातात देत अजित म्हणाला, "चला. गाडीत बसून खाऊन घ्या थोडंसं." अंदू मोठ्या आशेनी त्या पुडक्याकडे बघत आईला कोपराने हळूच टोचत होता. ती निर्विकार बाई डोळ्यात काही विशेष प्रश्न घेऊनच मिरवत होती सकाळपासून. बाळाला तसंच उपाशी बसवून पुढील प्रवास चालू झाला. राजाशी संवाद होत नव्हता. पुढचा प्रवास गाणी ऐकत करावा म्हणून अजितने सीडी लावली होती. घुमेपणाचं कारण शोधण्यात अजितला काडीचा रस नव्हता.
स्वरानंद लुटताना अजितचे डोळे नेत्रसुखावर केंद्रित होते. इथून पुढचं ड्रायविंग म्हणजे सुखच सुख.
सूर्यानी कातडी भाजायला सुरुवात केली होती. पण पुढच्या ह्या वाटेवर रस्त्याच्या दुतर्फा तरूमंडळींनी गर्दी केली होती. डोईवर कमान आणि त्यातून डोकावणारा प्रकाश, वाटा उजळवून टाकत होता. लाही करणारी कठोर किरणं वृक्षांच्या खांद्यावर विसावत होती. पानांचे पंखे करून आल्या गेल्याचं स्वागत करण्यात ही वृक्षमंडळी मग्न होती. गाड्यांच्या खिडक्या उघड्या टाकून त्या भर उन्हातल्या गारव्यात अजित आनंदला होता. मागील मंडळी काय करतात ह्याचं देणंघेणं त्याला नव्हतं. आपल्याच धुंदीत तो पुढे जात होता. पाळणारी झाडं आपला वेग वाढवत होती. त्या झाडांच्या बरोबरीनं पलीकडली वावरं जोमानं पळत होती. कधी काळी माती, कातळ, कधी पुरुषभर उंचीची पिकं, कधी घोटभर उंचीचे गवतगालिचे, मूठभर माणसं, कौलारू घरं वावरात झलक देऊन जात होते.
अजितला कशाचीच फिकीर नव्हती. गाडीतल्या ऑडिओवर लागलेल्या सुरात आपला बेसूर मिसळत त्याला भेसूर करत असतानाच आवाज आला. "साहेब जरा बाजूला घ्या की." अजितने गाडी बाजूला घेतली मात्र, अंदूने पहिला नंबर लावला होता. स्टिअरिंगवर बसूनच बाहेर काय चाललंय ह्याचा अंदाज घेताना त्या तिघांच्या चेहऱ्यावरचा एक अनामिक मोकळेपणा अजितच्या नजरेतून सुटला नव्हता. काहीतरी मुरत होतं खरं. "असो. त्यांचं त्यांच्यापाशी." असा विचार करत अजित अंदूचा कार्यक्रम होण्याची वाट पाहात राहिला. नागमोडी रस्ता चालू झाल्याने गाडी लागण्यात काही वावगं नव्हतं. राजा पाणी घेऊन उभा होता आणि सुभद्रा पाठीवरून हात फिरवण्यात गुंतली होती.
"आमी ह्या भागात कधी आलोच नाही साहेब. नक्की कुठं चाललोय आपण?" सुभद्रेने संवाद चालू केला की काय?
“साखरगावला चाललोय ना!! मोऱ्यानं नाही सांगीतलं का? आणि तुमी काय म्हणता? गावी पीक पाणी काय म्हणतंय?” अजितने पुन्हा काही वाक्य बोलून खडा टाकून पाहिला. पण पहिले पाढे पंचावन्न.
“ठीकाय.” मोघम उत्तरांनंतर पुन्हा निशब्द!
"ह्या भागात आलोच नाही" ह्या वाक्यात तर काही गोम नव्हती ना? प्रश्न असूनही अजित विचारांच्या पलीकडे गेला होता.
कानावर पडणारे सूर, खिडकीतून येणारा आल्हाद, नजरेला सुखावणारा हिरव्याचा गारवा आणि अजित ह्यांचा एकजीव प्रवास चालू होता. समोरचं चकचकीत डाम्बर सोडलं तर सगळीकडे नटलेली नवरीच दिसत होती. शहरातलं ते रंगीबेरंगी कॉंक्रीट मागमूसालाही नव्हतं. घरापासून निघाल्यावर एक डोंगर ओलांडायचा अवकाश, एका जंगलातून दुसऱ्या जंगलात प्रवेश होई. एका बाजूला रुक्ष जंगल आणि दुसरीकडे सुखावणारे निसर्गसंपदेचे.
नेहमीचाच अनुभव पुन्हा एकदा घेत गाडी पुढी चालली होती. वारंवार थांबण्याचा आणि तेही लागत असलेली वळणं थोपवण्यासाठीचा अनुभव तो पहिल्यांदाच घेत होता. समोर एव्हढं सुंदर चित्र असूनही गाडी लागण्याचा विचार मनात आला मात्र, पुन्हा एकदा जोरात आवाज आला. "गाडी थांबायला सांगण्याच्या आधीच सिंचन झाले की काय?" असा विचार करतच अजितने गाडी पटकन बाजूला खेचली. आता मात्र अजित निर्विकार होता. पण....पण सुभद्रेच्या आणि राजाच्या चेहऱ्याचा रंग कुठेतरी हरवला होता. चेहऱ्याची ओघराळी झाली होती. काहीतरी होतं खास. पुन्हा पुन्हा तोच तोच विचार करून अजितही थकला होता. त्याच्यापुढे स्वर्ग दिसत होता. तासाभरातच गावी पोहोचण्याचे वेध लागले होते.
काही न बोलताच पुढची क्रिया घडत होती. दारांचा आवाज आला, इग्निशन वाजले. धप, धप! मागची दारे लागल्याची चाहूल लागली. गिअर पडला आणि डोंगर पुन्हा मागे पडू लागले. आता न थांबता शेवटपर्यंत जाऊ ठरवले तरीही मध्ये दोन थांबे लागलेच. अक्षरश: त्यांचे आडनाव गाडी "लागू" हे अजितने निश्चित केले. त्यांच्या पांढऱ्या फटक चेहऱ्याचे अर्थ काही त्याला "लागत" नव्हते.
शेवटच्या फाट्यावरून गाडी वळली. सुगंध दरवळला. उघड्या खिडकीतून वाऱ्याबरोबर येणारी धूळमाती त्यांच्या फुफ्फुसांचे क्षालन करीत होती. ३ किलोमीटरचे ते नागमोडी आणि कच्चे अंतर १५ मिनिटात पार झाले आणि समोर स्वर्ग दिसला. प्रवेशापाशीच लालमहाल होता. लाल दगडांनी तयार झालेलं गावचं घर!
फाटकाचे बांबू काढून त्याने गाडी आत सरकवली. माळ्याचं काम पाहणारा पठाण सामोरा आला. एव्हाना तो अस्खलित मराठी बोलू लागला होता. पण का कोण जाणे एकमेकांशी बोलताना अजित आणि पठाण सरावाने हिंदीच वापरत. "क्या खायेंगे शेट?" "कौनसी भाजी लाये हो आज?" "हम गरीब लोग साब. दाल चावल ही है। आपके लिये कुछ लेके आता हुं।" अजितला ह्या संवादापेक्षा जमिनीवर पसरण्यात जास्त रस होता. जीन्स मधून शॉर्ट्स मध्ये जात, शर्ट आणि गंजी काढून, उघड्या अंगाने त्या गार जमिनीवर पसरत अजित म्हणाला, "दाल चावल बना दो. बेस्ट!"
एव्हाना अंदूने आपला सवंगडी शोधला होता. सुभद्रेने पठाणाच्या बायकोशी संधान बांधण्याचा प्रयत्न चालू केला होता. पहुडलेल्या त्या स्वर्गीय अवस्थेत अजितच्या विचाराला पुन्हा चालना मिळाली. "काय असेल? गाव-शहर? पुरुष-स्त्री? नोकर-मालक? नक्की काय असेल की ज्याने सुभद्रेला गेले ६-७ तास चकार शब्द काढावासा वाटला नाही? आणि आता?" आता पठाण आणि राजाचा मराठीतला संवाद ऐकू येऊ लागला होता. भिंती पातळ असल्याने त्यांचं कुजबुजणंही रेडिओसारखं स्पष्ट ऐकू येत होतं. भुताखेतांच्या, मुंजाच्या, ओवाळलेल्या पपईच्या बाता सुरु होत्या. बोलता बोलता गोष्टी राखणदारावर आल्या. दारासमोरच्या तुळशीच्या पलीकडं एक आंब्याचं झाड होतं. त्याच्या पायथ्याशी म्हणे तो वेटोळं घालून बसे. दिसला की त्याला ओवाळायचं काम पठाणाची बायको माई करत असे. माईला मान देऊन तो तासाभरात अंतर्धान पावत असे. त्याने म्हणे कधीच कुणाला त्रास दिला नाही. आढ्याकडे बघत अजित ते संभाषण पचवत होता. एरव्ही अनेकदा ह्या गोष्टी अजितने ऐकल्या होत्या. पण आजचा सूर वेगळाच वाटत होता.
लसणाचा घमघमाट, भांड्यांचे आवाज पठाणाच्या पाकाची साक्ष देत होते. त्या गंधानेच अजितची भूक प्रज्ज्वलित होत होती. जिभेच्या सुखासाठी तो जमिनीवर झोपण्याचं सुख बाजूला सारून उठला आणि चुलीकडे गेला. पठाणशी बोलणं हे नुसतं निमित्त. तिथलं वातावरण रोमारोमात साठवून घेणं हेच ध्येय. चुलीतल्या जळत्या लाकडाकडे पाहात मिरच्यांचा ठसका नाकात साठवत जठराग्नीला थोपवण्याचं काम म्हणजे प्रत्याहाराचा नमुनाच जणू. ते रटरटणारं भन्नाट रसायन, बरोबर पठणानं केलेली भाकरी आणि सोबत नदीतल्या माशांचं कालवण ताटात रचून आल्याबरोबर, अजितचा निग्रह सुटला आणि मग नंतरची १० मिनिटे फक्त हात चालत होते, तोंड रवंथ करत होते, सगळ्या ग्रंथी स्रवून चेहरा निथळू लागला होता. सगळ्या रसांना मुक्त वाट करून अजित आता शांत झाला होता.
बरोबर आलेलं ते त्रिकूट अजूनही आपल्याच कोशात होतं. पठाणाशी काही गोष्टी करायचा यत्न करत होतं. चेहरे अजूनही भयपटाच्या पलीकडे गेले नव्हते. "काय शिजत असेल डोक्यात?" कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी त्या भयपटाचं प्रतिबिंब प्रश्नाच्या रूपात अजितच्या डोळ्यात दिसत होतं.
"राजा, चल मळ्यातून फटका मारून येऊ. कामं पाहू." राजाच्या उत्तराची वाट न पाहता अजित सुटला होता. ऊनं कितीही तापली असली तरी झावळ्यांनी धरलेल्या छत्र्यांनी गारव्याची सोय करून ठेवली होती. अजित कुठं नेतोय ह्याची चिंता करत राजा गुमान मागून चालत होता आणि अजितचं चर्वण ऐकत होता. सुभद्रा एका विचित्र नजरेने शून्य होऊन पाहात होती.
राजा आणि पठाण बांधावरून पुढं जात होते. राजा अजूनही हरवलेलाच होता.
घराकडे परत येताना अजितचे विहार पुन्हा मंदावले होते.
पडवीमध्ये पाठ टेकवत आणि आढ्याकडे बघत असताना पुन्हा शब्द कानावर पडत होते. आता मात्र छडा लावायचाच म्हणून तो कानोसा घेत हल्लक पावलांनी पठाणांच्या खोलीकडे गेला. ह्यानंतर मात्र त्यांनी जे ऐकलं त्यानंतर अजित छप्पर उडेपर्यंत हसत राहिला!!!
येताना आणलेलं शहाळं कोयत्यानं फोडत पठाण सांगत होता, "दर वर्षी कोंबडा द्यावा लागतोय, तेव्हा कुठं पीक पाणी जमतंय."
"कोंबडं?" सुभद्रेचे डोळे छताकडे गेले होते आणि जेमतेम शब्द फुटले होते.
"कधी?" आता राजानं आपलं तोंड उघडलं.
"आहे आता. साहेब आलेत तर द्यायला हवं. निदान यंदातरी. नाहीतर पिकाचं काही खरं नाही."
राजा आणि सुभद्रा एकमेकांकडे निशब्द बघत राहिले होते. पुढची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. असह्य ताण वाटत होता. पायांची थरथर वाढली होती, तोंडाची शुष्कता जाणवत होती. सुभद्रा मटकन खालीच बसली आणि डोळ्यांची नदी वाहात राहिली. पिंजऱ्यात अडकलेला पोपट असो किंवा वाघ, त्यांचा फक्त मोकळेपणा हरवलेला असतो. पण सुभद्रेला तिच्यात आणि खुराड्यातलं कोंबड्यात साम्य वाटत होतं.
राजाकडं पाहात ती म्हणाली "साहेबानं एवढं सहा घंट्यान्चा प्रवास करून आणलंय इथं. काहीतरी कारण असणारच. नाहीतर कोण कशाला आणेल गाडीतून?"
"जरा दमानं घे सुभद्रे." राजानं उसनं अवसान आणलं होतं पण त्याची शुष्क वाणी लपत नव्हती.
"आता काय खरं न्हाय." हंबराडाच फोडला सुभद्रेनं. अंदू बिचारा बिथरून गेला होता. अजितचे कान फुटले होते.
राजा देखील घळाघळा वाहायला लागला होता. धिप्पाड पठाण हातात कोयता घेऊन उभा होता. त्याच्या कोयत्यानं त्याचं काम केलं होतं. शहाळ्याचं डोकं फुटलं होतं. मात्र राजा सुभद्रेचे ते टाहो त्याच्या आकलनापलीकडचे होते.
मात्र राजाची खात्री पाटली होती. नारळाच्या जागी त्याला त्यांची डोकी दिसत होती आणि त्यावर जोमानं पिकलेलं शेत दिसत होतं.
पठाणाला जवळ करत राजाने त्याला आपलं करण्याच्या हेतूने विचारलं, "मालक, इथून परत कसं जायचं?"
"मालक? अरे भाऊ, इथं गाडी मुक्कामाला येती. येईल आतां आन जाईल उद्या." पठाण उत्तरला.
"गाडीत जाऊन झोपूया काय सुभद्रे?" ह्यावर सुभद्रेनं बरोबर आणलेला संसार सोडून दोन पिशव्या घेतल्या आणि म्हणाली, "चला."
पठाणाकडे पाहून पुढे म्हणाली, "दादा, मालकांनी इथपर्यंत आणलं. गावाकडं बळी देतात असं ऐकलंय. तुमी तर आताच म्हणाला कोंबडं की काय ते. प्रवासभर डोक्यात भुंगा होता. उतरायचा प्रयत्न केला. उलट्या काढल्या. पण मालक काही उतरूच देईनात. कुठे आलो, काहीच कळेना. बसची काही सोय होईना. मालकाशी बोलायला काही धजेना. काय करणार. आलो तसेच. इथं काही जेवण जाईना. तुमच्याशी काही बोलणं होईना. आता कळलं प्रकरण. जाऊ दे आम्हाला. गरिबांवर उपकार करा." सापाच्या गोळीतून जसा ना थांबणारा साप बाहेर येतो तसं तिचं भाषण! थांबलं एकदाचं. पठाणही तोवर हसून खाली बसला होता! लोळायचाच काय तो बाकी होता. "ताई, दोन वर्ष झाली मालकाच्या मागं लागलोय, कोंबडं द्या, कोंबडं द्या; ते जमना शेटला अजून आणि तुम्ही म्हणता .... !!!!!!!"
अजितचं ते सात मजली हसणं ऐकून पठाण, राजा आणि मंडळी बाहेर आली होती. एकमेकांकडे पाहून समजुतीच्या घोटाळ्याची खूण पटली होती. प्रवासभरच्या घुम्याची आणि जागोजागी थाबण्याची उकल अत्ता झाली होती. प्रवासात राजा-सुभद्रेच्या डोक्याची होणारी शंभर शकलं अजितच्या डोळ्यासमोरुन हालत नव्हती. त्याचं हसणं मजले चढवतच होतं.
प्रवासात न उघडलेलं कुलूप अजितच्या हसण्यानी उघडलं होतं. सगळ्या धूसर रेषा स्पष्ट होत होत्या. मळभ विरळ होत होतं. सुभद्रेचं स्मित मोकळं होत होतं.
आता सुभद्रेनी चुलीचा ताबा घेतला होता आणि अजितच्या खाद्ययोगाने पुन्हा उचल खाल्ली होती.