मुलाखत
मुलाखत
कॅन्सस सिटीमध्ये अनेक व्यक्ती भेटत असतात. मग त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावं असं वाटू लागतं.
प्र.: “नमस्कार. प्रथम आपला परिचय करुन घेऊ.”
उ.: “नमस्कार. मी प्रकाश नारायण बोरगांवकर. इथे, कॅन्सस सिटीमध्ये माझ्या मुलाकडे आलोय.”
प्र.: “अच्छा. प्रकाशजी, आपल्याला इथे कसं वाटतंय? विशेषतः मराठी मंडळी भेटल्यावर, त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यात वावरताना.”
उ.: “खरं सांगू का, आम्ही मुलांना भेटायला येत असतो. आमचा मुलगा वैभव, येथे Finance – Risk Management ह्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि तो आपला शरीर सौष्ठव क्रीडा हा छंदही जोपासतो. नुकताच तो Natural Bodybuilding स्पर्धेत पारितोषिकही जिंकलाय. त्यांच्याबरोबर वेळ घालवतांना असं वाटलं की आपण इथल्या मराठी मंडळींशी ओळख करुन घ्यावी. आणि मग जेव्हा इथल्या कार्यक्रमांविषयी माहिती कळली तेव्हा खूप आनंद झाला. आमच्या छोट्याशा वास्तव्यात आम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो नाही, मात्र काही जणांशी ओळख आणि चांगल्या गप्पा झाल्या. त्यातूनच ही मुलाखतही घडते आहे.”
प्र.: “अरे वा. म्हणजे कॅन्ससपार झेंडा फडकावलेल्या मराठ्यांशी गप्पा झाल्या आपल्या. मस्तच. प्रकाशजी, आम्हाला थोडंसं आपल्या बालपणाबद्दल सांगाल?”
उ.: “बालपण काय, सर्वसामान्यांसारखंच होतं. जन्म जबलपूरचा, वडील शिक्षक. आणि मग इंटरपर्यंत मंगळूरपीरला शिक्षण झाल्यावर, नागपूरला धरमपेठेतल्या काॅलेजात B.Sc. केलं. Mathematics-Statistics हा प्रमुख विषय होता.”
प्र.: “अरे वा! आज सगळीकडे Data Science चं वारं पसरलंय. आपलं शिक्षण तर त्याच क्षेत्रातलं.”
उ.: “खरंय. पण ते आता! मी ही गोष्ट करतोय तेव्हा ह्या शिक्षणानंतर मी बोरा केम इंजस्ट्रीज, मार्टिन हॅरिस अशा ठिकाणी काम केलं. व्यावसायिक स्थैर्य मात्र येत नव्हतं.”
प्र.: “म्हणजे, प्रत्येक पदवीधराला ज्या प्रक्रियेतून जावं लागतं त्यातून आपणही गेलात.”
उ.: “होय.“
प्र.: “मग त्यातून पुढे मार्गक्रमणा कशी झाली?”
उ.: “हेल्प एज इंडिया ह्या कंपनीची एक जाहिरात होती. ती पाहिली आणि म्हटलं प्रयत्न करुन पहायला काय हरकत आहे?”
प्र.: “हे सगळं ठीक. पण त्यावेळी ही संस्था एवढी नावारुपाला आली होती? आणि घरी प्रश्नचिह्न नाही निर्माण झाले?”
उ.: “झाले ना. ते काय चुकतंय? पण झऱ्याचं पाणी जमिनीत झिरपतंच ना.”
प्र.: “म्हणजे?”
उ.: “वडील शिक्षक होते. त्यांनाही सेवाभावी कार्य करायची सवय आणि आवड होती. मला हे काम चरितार्थासाठी करणं भागच होतं. आर्थिक स्थैर्य मिळणार होतं. म्हटलं, पाहूया जमतंय का!”
मं.प्र.: “अच्छा, म्हणजे अर्थार्जन हाच मुख्य उद्देश होता.”
उ.: “हो हो. अर्थातच!!!”
प्र.: “अरे, बोलता बोलता कोटी केली की तुम्ही. हा हा हा! इतके वर्षं नोकरी करुन आपल्या हाती काय लागलं असा विचार करतांना आपल्याला काय जाणवतं?”
उ.: “समाधान! एकच शब्द पुरेसा आहे. हेल्प एजने माझा चरितार्थ चालविला. महत्त्वाची गरज भागविली. माझ्या कुटुंबानेही पाठिंबा देण्यात कुठेही कसूर केली नाही. आधी आईवडील! त्यांचे आशीर्वादच मला पुढे घेऊन गेले. नंतरच्या काळात सहचारिणी आणि मुले. कामाच्या वेळा जरी नियमित असल्या तरी मदतीसाठी, बोलण्यासाठी केव्हाही फोन खणाणायचा. अनेक वेळा त्यानिमित्त वेळी अवेळी बाहेरही जावे लागे. पण घरात कधीही नाराजीचा सूर आला नाही. कौटुंबिक बाजू अशी भक्कमपणे सांभाळली गेली ना, की मग कसलीही चिंता न करता माणूस झोकून देऊन काम करू शकतो. त्याबाबतीत मी भाग्यवान ठरलो.”
प्र.: “खरंय”
उ.: “अनेक पायऱ्या चढत आज महाराष्ट्र गोव्यासाठी हेल्प एज चा अध्यक्ष म्हणून काम पाहताना अतिशय अभिमान वाटतो. आणि संस्थेबद्दल काय बोलावं! द्रष्टेपणा काय असतो ते ह्या संस्थेचं कार्य पाहिलं की लक्षात येतं. मी जेव्हा नोकरीस लागलो, तेव्हा वयोवृद्धांचा असा विचार करणारी संस्था म्हणजे खरंच कमाल होती.”
प्र.: “असा म्हणजे?”
उ.: “असा म्हणजे-ज्येष्ठांना सांभाळणं ही एक मोठी समस्या होणार आहे. त्याची काळजी घेतली पाहिजे. तरतूद करुन ठेवायला हवी. हा विचार दूरगामी होता.”
प्र.: “पण ज्येष्ठ ही समस्या कशी असतील?”
उ.: “ज्येष्ठ ही समस्या नाहीच आहेत. माझं बोलणं थोडं समजून घ्या. ज्येष्ठ हे आपल्या घरी असलेलं चालतं बोलतं गुरुकूल. त्यांचा अनुभव, त्यांनी ऐकलेल्या गोष्टी जागोजागी पेरुन नवीन पिढीला प्राणवायू देणारी ही एक संस्थाच. आता होतंय काय, की आयुर्मान वाढलंय, वैद्यकीय उपचार आहेत त्यामुळे आपण ज्येष्ठांचा अधिकाधिक सहवास अनभवू शकतो. त्यांचे अनुभव आपल्याला समृद्ध करतात. पण आयुष्याचा वेगही वाढलाय. प्रत्येक जण पळत असतो. एकत्र कुटुंब असते पण ते राहतात दूर दूर. अनेक वेळा तर असं होतं की सगळ्यांबरोबर राहून पण ज्येष्ठ एकटेच असतात. कुणाला वेळच नसतो. हा दोष नवीन पिढीचाही नाही. कालाय तस्मै नमः. मग त्यासाठी ही संस्था उभी राहिली. उद्देश हा की, ज्येष्ठांना सन्मान मिळावा.”
प्र.: “अच्छा, म्हणजे जे वृद्धाश्रम तयार झालेत त्या संकल्पनेला छेद देणारी ही संकल्पना.”
उ.: “गल्लत होतेय. वृद्धाश्रम ही देखील काळाची गरज आहे. मात्र हेल्प एज चा मुख्य उद्देश तो नाही. आम्ही वृद्धाश्रम चालवत नाही. असं पहा, ऐंशी वयोगटातल्या वृ्द्धांची मुलेही साठीला आलेली असतात. त्यांनाही अनेक व्याधी असू शकतात. तेही गोळ्यांवर जगत असतात. त्यांनाही आधार हवा असतो. त्यांचीही मुले त्यांच्या आयुष्यात गर्क असतात. अशा वेळी वृद्धाश्रम हाही एक उत्तम उपाय आहेच की. मात्र तो हेल्प एजच्या मुख्य कार्याचा भाग नाही.”
प्र.: “अच्छा. अजून थोडं विषद करुन सांगाल?”
उ.: “असं पहा, प्रत्येकाला सन्मान हा हवा असतो. काही वेळा आपले रक्ताचे लोक नसतात जवळ. पण मग आम्ही शाळेच्या सहली घेऊन जातो, ज्येष्ठांबरोबर वेळ घालवतो, त्यांच्या गरजा भागविण्यासाठी fundraising करतो, आजी आजोबा दत्तक योजना चालवितो. काही विशेष काळजी घ्यावी लागते. काही आजी आजोबांना वृद्धाश्रमात सोडून दिलेलं असतं. म्हणजे आपण जी सोय म्हणून पाहतो, त्याचा गैरफायदा घेतात काही मुलं. अशा वेळी त्यांना कुणी भेटायला येत नाही. मग आपण बोलताना घराचे विषय टाळायला लागतात. नाहीतर त्याना ह्रदय पिळवटणारं दुःख होतं.”
प्र.: “आपल्या ह्या कारकिर्दीत काही लक्षात राहण्याजोगे अनुभव सांगू शकाल?”
उ.: “अनुभव सांगायला बसलो तर वेळ पुरायचा नाही. ह्या क्षेत्रात अनुभवांची वानवा नाही. एकच अनुभव सांगतो. मुलांची वृद्धाश्रमाला भेट आयोजित केली होती. तिथे अनेक आजी आजोबा होते. कुणी स्वेच्छेने आलेले, कुणी आल्यावर रमलेले, कुणी हाकलून दिलेले, काहींना भेटायला कुणी येत नसे, असे अनेक. शाळेची सहल येणार म्हणून सगळे आजी आजोबा आनंदाने आवरुन, काही नटून बसले होते. स्वागताला तयारच होते. बस आली, आणि एकेक मुलगी उतरु लागली. समोरच उभ्या आजी आजोबांकडे पाहून छानसं स्मित करु लागले. मात्र एक मुलगी उतरली आणि नुसतीच स्तब्ध उभी राहिली. हलेच ना. आम्ही पाहिलं तर ती एकाच आजींकडे एकटक बघत होती. अनपेक्षितपणे समोर स्वतःचीच आजी दिसल्याने ती भांबावून गेली होती. जरा भानावर आल्यावर आजीला जाऊन बिलगली. त्या मुलीला तिच्या आईवडिलांनी सांगितलं होतं की आजी गावी गेलीय. केव्हा येणार विचारल्यावर, येईल, येईल असा वेळकाढूपणा करत होते तिचे आईवडील. त्या दिवशी आजी भेटल्यावर मात्र ती नात आजीला घरी घेऊन गेली.”
प्र.: “पाणी तरळलं! अतिशय हृद्य अनुभव.”
उ.: “खरंय. असे हृदयस्पर्शी अनुभव पोती भरुन आहेत. US मधल्या लोकांचेदेखील आईवडील भारतात आहेत. त्यांनाही vent पाहिजेच आणि ज्यांना मुलं नाहीत त्यांनाही. म्हणून म्हणालो समस्या तर आहेच.”
प्र.: “अमेरिकन दृष्टीकोणातून ह्या समस्येकडे आपण कसे पाहता आणि त्यावर काही भाष्य?”
उ.: “समस्या सगळीकडे तीच आहे. स्वरुप वेगवेगळे आहे. मघा म्हटल्याप्रमाणे अमेरिकस्थ भारतीयांचे भारतातले आईवडील हा एक पैलू आहे. त्यांचे अमेरिकेत आलेले आईवडील हा दुसरा आणि अमेरिकन लोकांचा तिसरा असे पैलू स्पष्ट दिसतात. अमेरिकन लोकांची संस्कृती ही विभक्त पद्धतीवर आधारित असल्याने त्यांना कमी अडचणी असतील अशी एक समजूत आहे. परंतु मनुष्यस्वभाव आणि त्याच्या मानसिक गरजा ह्या सगळीकडे सारख्याच असतात. त्याचे परिणाम थोडे वेगळे होत असतील कदाचित. उपायही साधारणतः सारखेच. त्यांचा एकाकीपणा दूर करायचा प्रयत्न करायचा. कसा? ज्येष्ठांचे ग्रुप्स करायचे, त्यांना जाऊन भेटायचं आणि फक्त ऐकायचं. कुणीतरी ऐकायला हवं ही त्यांची गरज असते. बाकी त्यांना शारिरिक दृष्ट्या काही कामं जमत नाहीत हे मान्य नसतं. त्यामुळे त्यांच्या ह्या भावनेला मान देऊन त्यांची कामं करणं महत्त्वाचं. आणि माझा अनुभव हेच सांगतो की प्रत्येक परिस्थितीला आणि व्यक्तीला संवेदनशील नजरेने पाहिलं तर त्यावेळेला जे उत्तर मिळेल ते योग्य आणि उपयुक्तच असतं.”
प्र.: “लाख बोललात प्रकाशजी. आपल्याशी बोलून अतिशय आनंद झाला. आपले अनुभव आम्हाला समृद्ध करुन जातील हे नक्की. आपण गप्पा मारण्यासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ कॅन्सस सिटी तर्फे आपले आभार. पुन्हा भेटू. नमस्कार.”