मराठी
मराठी
स्प्रिंगमध्ये चालताना गवत जसं टोचलं,
पोट्ट्याला आमच्या गवतफूल दिसलं
कसला छान म्हणे, उत्सव हा उन्हाचा,
मागेपुढे सर्वत्र, साज हा पिवळ्याचा
छोटुली फुले कशी सूर्यापुढे हसतात,
झुळुक हळुच येताना, वाऱ्यासवे डोलतात
स्प्रिंगच्या सुट्टीत हेच गीत फुलतं,
बापबेट्याचं मग छान द्वंद्व रंगतं
आहे का पॉप्सा, भारतात अशी गंमत
बसा तुम्ही नुस्तं, आपलंच गाणं म्हणत
उत्तरताना मात्र साधंच आपलं हसणं
मनातल्या मनातलं बालकवींचं गाणं
इंदिरा संतांचं गीतही ओठांवर येतं
इथला स्प्रिंग बघूनही उधळायला होतं
आमचा स्प्रिंगही बेट्या नादखुळाच होता
कवितेंच्या जोडीने पुस्तकातही होता
शिंकायचं कधी तेव्हा, कामंच नव्हतं
अॅलर्जीचं दुकान उघडलंही नव्हतं
निसर्गात काही आमचं तुमचं नसतं
डोळ्यात साठवत, शब्दात मांडायचं असतं
हॅलोविनचं भूत आलंया दारी
चॉकलेट घ्याया काढलिया वारी
येती त्यांच्या पितरांचे दूत
गल्लोगल्ली आलाय भुतांना ऊत
सणाची ह्यांच्या भन्नाट रीत
पोट्टी म्हणे ट्रिक ऑर ट्रीट
दारोदारी आज भोपळ्याचा साज
गंमतीचा सारा असा रिवाज
पितरांचा उडाला गोंधळ पुरता
इथे जाऊ की तिथे विचार नुसता
आमच्याकडे आहे चॅाकलेटचे ताट
भारतात म्हणे खिरीचा थाट
पितृपक्ष म्हणी त्याला कुणी म्हणे श्राद्ध
स्मरणास पितरांच्या सर्व आम्ही सिद्ध
वर्षांतून एकदा म्हणे ते येऊन जातात
इथे भीती, तिथे म्हणे जेऊन जातात
त्यांच्या स्वागताला कधी मंत्रादिकांचा उच्चार
कुणाकुणाकडे म्हणे, ना कसले उपचार
ह्यांचे न् त्यांचे पितर डिफरंट असतात
भावना मात्र सगळ्यांच्या सेमसेमच असतात
ए सोन्या, बोल्या, खोक्या, गोट्या खेळू या गड्यांनो
किती गोट्या लावू या रे?
७० पुरतील ना लेको. गल्लीत लावू राज्य
प्रेक्षक टाळ्या साठी सज्ज
सोन्या लिंबू टिंबू
सोन्याचा बाब्या टिंगू
बोल्याचा कारभार जगभर
गोट्या साठी जीभ मैल भर
खोक्याची धाव छोटी
चळवळीच्या साऱ्या गोष्टी
सगळीकडून आणले खेळाडू भरून
खेळ चालू नेम धरून
खोक्याचे नशीब बलवत्तर
काबीज तीन उणे सत्तर
रडत रडत सोन्या गेला
हसत हसत बाब्या बोलला
फुटक्या सगळ्या गोट्या
पिटवा अशा दवंड्या
खोक्याची आली कीव
सोन्याचा जाइल जीव
कसला भारी आमचा घाट
खोक्याची लागेल आता वाट
राज्य असले तरी असेल अर्धेच
आडवा घालू आपण मध्येच
बसेल जुळवत फुटक्या गोट्या
प्रेक्षक हाणतील आपसूकच सोट्या
कसला भारी आमचा आव
कृष्ण (कृत्य) आमचा अन त्यांचे नाव
गल्लीच्या बाहेर आमचेच छत्र
साखळीचोर आमचेही मित्र
पायाची भिंगरी विमानाचे पंख
सोन्याची माती सोनाराचे शंख
कोळसा बनवू सोन्याचा
टका बनवू कोळशाचा
पाय आमचे मातीचेच
कार्य सगळे टक्याचेच
कोतवालाचा मुखवटा मी बहुरूपी जातिवंत
अगणित पळवाटा मी कोल्हा हा मूर्तिमंत
अजुनि सलातोच आहे त्या काटा कसे म्हणेन मी
आठवणींचा पूर लोटला त्याला कसे टाळेन मी
सोबत्याचा गाव आला त्या थांब कसा म्हणेन मी
टप्प्यावर एका मार्ग खुंटला त्या वाढ कसा म्हणेन मी
रस्त्यावरचा दिवा विझला त्या वात कशी लावेन मी
अंधाऱ्या मग वाटेवरती एकटाच हा चालेन मी
आधाराच्या वेलींचा त्या त्याग कसा करेन मी
तरीही अशा तरुशाखांना निस्संकोच कसा धरेन मी
मर्म शोधीत जीवनाचे मार्गक्रमणा करेन मी
अंधाऱ्या त्या वाटेवरती तेजास एका शोधेन मी
एक सुंदर रेषा लांब सोनेरी किनार
समुद्राचा अंत तिथे धरणीचा मेळ
क्षितिजावर आहे तेजःपुंज गोल
सूर्य म्हणती त्याला तो सजीवांचा देव
दूर असुनी मात्र सर्वांचा तो बाप
परत न मागे काही दिला त्याने प्रकाश
न पाहू प्रेम त्याचे आम्ही पाहू ताप
उष्ण उष्ण म्हणत करू फक्त आक्रोश
तमा नसे आम्हा जरी हा ग्रहणाने त्रस्त
ढगांनी झाकला तरी हळूच ठेवी लक्ष
पावसाचा कितीही मोठा जरी घाला
पुन्हा येवून हा सुकवी पाण्याला
झेप आमची थिटी नजरेपुढे न गेली कधी
सूर्याविना सृष्टी नाही हे न कळले कधी
करणीचा आमुच्या प्रसादही मिळाला
तळपता आमचा सूर्य माध्यान्हीच ढळाला
रेषांची वर्तुळे पाण्याच्या धारा
शीळ घालत ये बेभान हा वारा
बेचैन मन माझे तुजभवती फिरे
हरेक थेंब मोती तुला साद घाले
भिजवू शकेना पाऊस पाण्याचा
जोरकस धारांमध्ये मी मात्र कोरडा
पावसाविना चिंब कितीक वर्षाव
झिरपती आज माझिया मनात
आठवणींचे थेंब ओथंबून भरले
मनातील ढग बेभान बरसले
न कोरडा कोणी कधीही कुठेही
जाणीव उबेची अंतरी सखीची
एक होती सोनपरी वाट बघत होती आमची
बाबाला आठवण नाही मम्मालाही नाही
एके दिनी परन्तु बाबा म्हणाला कुठे असेल सोनुली
मम्मलाही त्या वेळी कुठुनशी हाक आली
अन्धुकलेले निश्चय उमटले मन:पटलावर
निश्चयाचे ध्येय जहाले विचार जुळल्यावर
कितिक कुम्पणे होती
काही काटेरी काही मायेची
काटेरी कुम्पणे पार जहाली विनासायास
मायेच्या रेषान्नी काही काल जखडले मात्र
हलुहलू दूर ज़हाली सगळी कुम्पणे
सभोवार आता होती माया चहुकडे
संपले वाट बघणे भेटलो छकुलीला
स्पर्शाने एका ओलाखीच्या खुणा कलाल्या
हास्य उमटले चिमुकल्या ओठांवर
बोळके हसले आम्हाला बघितल्यावर
आनंद सोहळा मीलानाचा
सोनपरी आणि तिच्या माणसांचा
कुटुंब आमुचे आणि शेजारी साचे
बघत होते भाग्य आमुचे
लेकीच्या आगमनाचे
शिकारी बाणा होता नजरेत अंगार होता
शिकार धर्म होता हातात नेम होता
यष्ट्यांचा ध्यास होता बळींचा घास होता
जगात मान होता मानाचा मुजरा होता
कुठे हरवला कसा हरपला माझा अश्व हा कुणी अडवला…….
जगात कोणी नाही गुरुची छाया नाही
नेत्याचा हात नाही स्वतहाचा स्वच नाही
लोकांची थाप नाही नजरेची ज्योत नाही
कशाची आस नाही कुठली आशा नाही
कुठे हरवला कसा हरपला माझा अश्व हा कुणी अडवला…….
आज ती हाक आली मनाशी गाठ झाली
वीरश्री भरून आली पायात दौड आली
मनाची निष्ठा केली अल्लाची भाक केली
डोळे जणू आग बोली पायाने कूच केली
कसा गवसला कुणी धाडला माझा अश्व हा भन्नाट दौडला
संधी ही पायी आली तिची मी चीज केली
दृष्टीत धाक आली तिघांची मोळी केली
लोकांनी थाप दिली यशानी साथ दिली
हिरव्याची होळी झाली निळ्याची सरशी झाली
कसा गवसला कुणी धाडला माझा अश्व हा भन्नाट दौडला
निळे मोकळे आकाश सर्वत्र हिरवा निसर्ग
छोट्याशा घरट्यात पिल्लाचा चिवचिवाट
दाण्यासाठी घरासाठी आकाशी भरारी
मोठ्या घरट्यासाठी जावू दुसऱ्या आकाशी
डोळे मागे पिल्लाकडे पिल्लू असे मायेकडे
डोळ्यांमध्ये असे बाळाची मिठी
मिठीमध्ये असे तृप्ती जन्मांतरीची
मनामध्ये आणिक पक्षिणीचा साज
भेटण्या तिला अंतरीची ओढ
घरटयाभावती एक अनोखे कुंपण
एकरूप असे आणि जगाचा विसर
कुठे असे ती सुखाची जाणीव
कुठे गेली ती घरट्याची उब
सोन्याला चिमुकल्याला कुठे सोडले
पंखात बळ नाही आणि आकाशी उडाले
टाहो उरला न उरले काही
घरट्यावर छानशा काळ घाला घाली
पाण्याचे रौद्र धरणीचा कोप
एकटेपणा आणि हृदयाचा कंप
असह्य जगणे दिसे ना प्रकाश
माजले मनामध्ये विचारांचे काहूर
का गळाले आता पक्षिणीचे पंख
का दूर गेली दाण्याची चोच
का उब गेली अन उरला काळोख
का पिलू भरकटले आणि उरला एक शोध
एक ध्यास घ्यावा वाटे शोधण्या किनारा
सोड बाळा सारे आवर स्वतःला
सारे हे सहुनी मानव शीणलासी
मनाविपरी म्हणे ईश्वरेच्छा गरीयसी
मोकळ्या आभाळी स्वच्छंद भरारी
सोडले पाशाचे धागेही माघारी
फिरता स्वच्छंद दाणाही टिपत
चालला पुरत आनंद भोगत
निळे मोकळे आकाश सर्वत्र हिरवा निसर्ग
छोट्याशा घरट्यात पिल्लाचा चिवचिवाट
दाण्यासाठी घरासाठी आकाशी भरारी
मोठ्या घरट्यासाठी जावू दुसऱ्या आका
डोळे मागे पिल्लाकडे पिल्लू असे मायेकडे
डोळ्यांमध्ये असे बाळाची मिठी
मिठीमध्ये असे तृप्ती जन्मांतरीची
मनामध्ये आणिक पक्षिणीचा साज
भेटण्या तिला अंतरीची ओढ
घरटयाभावती एक अनोखे कुंपण
एकरूप असे आणि जगाचा विसर
कुठे असे ती सुखाची जाणीव
कुठे गेली ती घरट्याची उब
सोन्याला चिमुकल्याला कुठे सोडले
पंखात बळ नाही आणि आकाशी उडाले
टाहो उरला न उरले काही
घरट्यावर छानशा काळ घाला घाली
पाण्याचे रौद्र धरणीचा कोप
एकटेपणा आणि हृदयाचा कंप
असह्य जगणे दिसे ना प्रकाश
माजले मनामध्ये विचारांचे काहूर
का गळाले आता पक्षिणीचे पंख
का दूर गेली दाण्याची चोच
का उब गेली अन उरला काळोख
का पिलू भरकटले आणि उरला एक शोध
एक ध्यास घ्यावा वाटे शोधण्या किनारा
सोड बाळा सारे आवर स्वतःला
सारे हे सहुनी मानव शीणलासी
मनाविपरी म्हणे ईश्वरेच्छा गरीयसी
झाडावरुनि फिरता फिरता पक्षिणीची भेट झाली
झाडावरूनि फिरते नजर सारी फुले मोहरली
फुलाफुलात गंध होता भ्रमराचा वास होता
वाऱ्याचा आल्हाद होता सप्तसुरांचा नाद होता
झाडावरूनि ढळता नजर पक्षिणीची तूट झाली
आजुबाजू हवा सारी शून्याने मात्र भरली
नाद हरपले रंग फिकटले मोकळा जाहलो मी
शिशिरापुर्वीच उडालो पाचोळा होवून मी
पहाटे पहाटे तुझी हाक आली
समुद्राच्या लाटेवर तुझी छबी शोधली
कळेना गणिते आवाजाच्या दिशांची
सैरभैर माझी बुद्धी कस्तुरीची
समुद्राच्या तळाशी तुला पाहून आलो
क्षितीजाच्या रेषेशी तुला शोधून आलो
दिसेना कुठेही तुझा लवलेश
तुला पाहू म्हणुनी जीव करी आक्रोश
सुगंध शोधताना स्तब्ध जग सारे
कुठून येते हाळी म्हणुनी स्वतःला विचारे
शब्दवेध घेता कळली दिशा आवाजाची
अंतरात अंतरीची गळाभेट झाली
कस्तुरीचा सुगन्ध आता आसमंती दरवळे
श्वासातला गंध अन हाक आता उलगडे
मोळीत मुग्ध माझे मन प्रेमात मुक्त न्हावे
होळीत दग्ध व्हावे अन् रंगात व्यक्त व्हावे
मधुमास धुंद होई धरेवर साजिरा
मदमस्त त्यात मी नशेत हा बरा
टक्यात गुंतलो मी काष्ठात ही अडकलो
मोहात फसलो मी दुःखात ही बुडालो
लौकिक लाकडांनी मोळीत बद्ध व्हावे
होळीत दग्ध व्हावे अन् रंगात व्यक्त व्हावे
ग्रहमाला भौतिकाची रवीस माळलेली
सुखहिरण्यकिरणे ग्रहणात पोळलेली
मायामोह लेवून पसरावी छद्मछाया
झाकोळून सूर्यास सजते अशीच काया
बद्धकाटक्यांनी हे ग्रहणही सुटावे
होळीत दग्ध व्हावे अन् रंगात व्यक्त व्हावे
मुक्त नभात माझे नयन स्थिरावता
शांत शांत त्या तिथे काया विसावता
मोळीत मुग्ध माझे मन प्रेमात मुक्त न्हावे
होळीत दग्ध व्हावे अन् रंगात व्यक्त व्हावे
रंगांतूनी फिरताना श्वेतरुप व्हावे
होळीत दग्ध व्हावे अन् रंगात व्यक्त व्हावे
आयुष्य कधीकधी सरळ, कधी ते छाती दडपणारं
कधीकधी ते वळणदार, वळण असलं तरी घाटदार
पुढे जाताना पाणी वाहून गेलेलं, कुठेकुठे आठवणी साचलेलं
कधी फुलाला गुंजारवाने भारलेलं, कधी त्यालाच आळ्यांनी वेढलेलं
कधी कुणाला काट्यांनी बोचलेलं, न साहवून कधी झुडुपच खुडलेलं
कुंपणावरलं वेलीबुट्टींचं रिंगण, वासाला सुगंधी अन् डोळ्यांना सुखद
बहरानंतर मात्र शुष्क असं काष्ठ, बोटांनी तुटणारं टाकाऊ निर्माल्य
सरळ माडाला सूर्यानी छेदलेलं, तरीही जमिनीत तग मात्र धरलेलं
आपला दुभंग आपणच भरणारं
डोईवर पाण्याचा अखंड स्रोत वाहणारं
येक डोंबारी चाले हवेतल्या दोरीवर
दोर अंगठ्यात, हाती काठीचा आधार
वाजे डमरु, वाजे ढोलकही खाली
चालताना त्याची तालाशीच मैतरी
दोर नाही कापला न डमरुही संपला
वाजणाऱ्या हातांनी पोबाराही केला
पायही पांगले दिशा उमगल्या नवीन
पथाऱ्या केल्या आता गावही नवीन
हरेक राहुटी कशी प्रसवसंपन्न
एकातून एक असे सतरा अर्भक
वाढ त्यांची जशी शशीच्या त्या कला
ध्यान पुनवेचे विसर आवसेचा
सुटलेल्या मोळीची सुटलेली लाकडे
एकट्याच्या शक्तीसाठी देवास साकडे
नुसत्या भिंतींचे मोठ्ठाले कोनाडे
प्राण हरला उरले महाली सांगाडे
वाट ओळखीची परि अनोळखी ती
अंधार दिसता ती भासे प्रकाशमयही
निश्चल उभा मी ब्रह्मांड फिरतसे गोल
गती स्तब्ध की स्तब्धातूनी चरचर
पाडाव की म्हणावा ध्येय असे समोर
समीप क्षितीज आणि किनारासेऽस्फुट
निश्चल मन क्षणी भावनांचा कल्लोळ
प्राणसखा मरुद्वाहे प्राणांतक वादळ
मिटल्या डोळ्यांत अदृश्य महालाची छटा
लांब सावल्यांत सुगंधी फुलांचा सडा
एक तू अन् एक मी
चषक तू अन् ओठ मी
थेंबातूनि मदिरेच्या
एकेक पुष्प झिरपते
पुष्पांतूनि मग त्या
कवनहार उमलते
प्रेरक तू कल्पक मी
पाडकामनिष्णातही
सुहृदांसवे बैसता
पाडकामपूर्णत्त्वही
नात्यांमधले रंग कसे हुडकावे
त्या गहिऱ्या गडद पर्णांच्या, आतले काटे कसे सोसावे
ती पर्णफुले त्या शाखा वृक्षांच्या
तो प्रेमओलावा सारे कसे निसटावे
नात्यांमधले रंग कसे हुडकावे
सरसर नवी दुलाई, हिरवी शाल सरकावी
सुमनगंधरंगमरंद, लयलूट जरा थंडावी
बहरता नाती कधी, जुनी काजळता
मनातले विश्व कसे अस्फुटावे
नात्यांमधले रंग कसे हुडकावे
शुष्कपर्णांचे पतन भूवर, पालवी ही न दिसावी
पाचोळा रुजवीत बीज, झाडांचे रंग खुलावे
नवांकूर न दूर नवगंध, कुठुनसे यावे
नात्यांमधले रंग कसे हुडकावे